डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपक्रम

औंध, ता. २१ : रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त उद्यापासून म्हणजेच २२ सप्टेंबर २०२४ पासून कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी दिली आहे.

 

बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथे कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कर्मवीर सप्ताहाची सुरुवात उद्या सकाळी ७ वाजता कर्मवीर चित्ररथ मिळवणूक सोहळ्यांनी होणार आहे. सदरची मिरवणुक महाविद्यालयापासून विठ्ठल मंदिर चौक – शेळके पथ रोड – हनुमान मंदिर चौक – श्री. पवार पथ रोड – गोवळकर गुरुजी शाळा – सरकारी हॉस्पिटल कॉर्नर- गुरुद्वारा मंदिर रोड – मलिंग चौक आणि नंतर महाविद्यालय या मार्गे होणार आहे.

 

तसेच येत्या २३ सप्टेंबर २०२४ रोजी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती मुख्य समारंभ आयोजित करण्यात आले आहे. सदर समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ वाजता संपन्न होईल. या समारंभात रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. राम कांडगे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे तसेच महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय संचालक व सल्लागार सचिन इटकर उपस्थित राहणार आहे.

 

यानंतर २4 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ‘कर्मवीरायन चित्रपट’ विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करण्यात येणार आहे. तर २६ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शुक्रवार म्हणजे २७ सप्टेंबर रोजी शेळकेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ औंध यांच्या विद्यमाने संपन्न होणार आहे. यामध्ये २८ सप्टेंबर रोजी प्रा. महेश गायकवाड यांचे व्याख्यान संपन्न होईल. तसेच ३० सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेले आविष्कार म्हणजेच अविष्कार पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.सविता पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी खवळे यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. तसेच या सर्व कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, रयतसेवक वृंद व महाविद्यालय विकास समिती सदस्य तसेच औंध परिसरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.अरुण आंधळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *