अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्ष व्यवसायिक जगतामध्ये प्रवेश करत आहात. यापुढील जिवनात अनेक आव्हाने समोर येतील. या आव्हानांना सकारात्मक विचार करून सामोरे जा. यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त तथा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पुणे बिझनेस स्कूलचा दुसरा पदवी प्रदान सोहळा निगडी येथील संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलगुरू डॉ. पराग काळकर, डिलॉईट कंपनीचे कार्यकारी संचालक रवी प्रताप सिंग, हॉर्टिकल्चर इन्सेक्टिसाईड इं. चे महाव्यवस्थापक प्रवीण जाधव, बीएनवाय मिलॉनचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी त्यागी, पीसीईटी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे आदी उपस्थित होते. प्रारंभी पीबीएसच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा डॉ. राव यांनी घेतला. यावेळी विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. काळकर म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो. विज्ञान तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत आहे. विद्यार्थ्यांनी काळानुरूप धावण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, तरच प्रगती करून भविष्य उज्ज्वल होईल.
मुटगेकर म्हणाले की, जगभरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु चांगले मनुष्यबळ नसल्याने रोजगारा बरोबरच आर्थिक विकासाला मर्यादा पडतात. विद्यार्थ्यांनी स्वप्न साकारण्यासाठी मिळालेली संधी न सोडता प्रामाणिक प्रयत्न, कठोर परिश्रम घेतले पाहिजेत; म्हणजे आयुष्यात यशस्वी व्हाल, असे मुटगेकर यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाली असली तरी विविध क्षेत्रात माणसाने प्रत्यक्षात काम केले तरच आपली प्रगती होऊ शकते. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता पेक्षा प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले तर ते अधिक परिणामकारक आणि उपयुक्त ठरते, असे रवी प्रताप सिंग यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी ज्या विषयात शिक्षण घेतले, त्याच क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार करावा. कौशल्य विकास आणि संवाद कौशल्यावर भर देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या मध्ये बदल तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सुधारणा केल्या पाहिजेत, असे मार्गदर्शन प्रवीण जाधव यांनी केले.
प्रास्ताविक डॉ. गणेश राव यांनी केले. डॉ. मिनाक्षी त्यागी यांनी आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.