निसर्गाचा ऱ्हास करणारा विश्वगुरू होणे अशक्य : डॉ. राजेंद्र सिंह डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‌‘जोहड‌’ इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन

पुणे : 21व्या शतकात आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमागे लागून निसर्गाचा नाश केला जात आहे. अशा परिस्थितीत देश कधीही विश्वगुरू होऊ शकणार नाही. ज्या वेळी पाणी आणि निसर्गावर प्रेम केले जाईल त्या वेळी आंतरिक ताकद वाढून देशाची विश्वगुरू बनण्यासाठी वाटचाल सुरू होईल, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. मराठी भाषेतील ‌‘जोहड‌’मुळे महाराष्ट्र आणि राजस्थानचे नाते जोडले गेल्याने महाराष्ट्रातील लोकांशी माझी मैत्री झाली. हे पुस्तक इंग्रजी भाषेत आल्यामुळे आता माझी माझी मैत्री देश-विदेशातील लोकांशी होईल, अशा भावनिक शब्दात त्यांनी नात्याची वीण अधिक घट्ट केली.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सामाजिक कार्याविषयीच्या ‌‘जोहड‌’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन आज (दि. 22) झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन जिमखाना भागातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत श्रीराम पवार अध्यक्षस्थानी होते. जागतिक नदी दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रकाशन साहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक संदीप तापकीर, दुराई स्वामी, ‌‘जोहड‌’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या लेखिका सुरेखा शहा, डॉ. कैलास बवले व्यासपीठावर होते. सुरेखा शाह यांनी सुमारे तीन दशकांपूर्वी डॉ. राजेंद्र सिंह यांच्या कार्यावर ‌‘जोहड‌’ पुस्तक लिहले आहे. त्याचा इंग्रजी भाषेत अनुवाद हेमांगिनी जावडेकर-पुराणिक यांनी केला आहे.

जल-वायू परिवर्तनामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे, त्यामुळे पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, हा मुद्दा अधोरेखित करून डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, मला राजनिती-अर्थनिती समजत नाही; जमतही नाही परंतु पाणी, नदी, पृथ्वी आणि निसर्ग याविषयी मला समजते, सांगता येते. ते पुढे म्हणाले, भारतात आजही मूळ ज्ञान भरपूर आहे; परंतु मानवी व्यवहारात आपण कमी पडत आहोत. मूळ ज्ञान व्यवहारात आणल्यास त्याला विद्या म्हटले जाईल. परंतु आज आपण ज्ञानाला, विद्येला विसरून व्यावहारिक शिक्षणाला अधिक महत्त्व दिले आहे. असे शिक्षण आपल्याला फक्त स्वार्थी व नोकरदार बनवित आहे. सर्वांच्या सुखासाठी पारंपरिक विद्या ग्रहण करणे गरजेची आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतान श्रीराम पवार म्हणाले, डॉ. राजेंद्र सिंह हे परिवर्तनवादी असून ते निसर्गाशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या कामामागे तत्त्वज्ञान आहे, ते उत्तम संवादक आहेत. त्यांच्या कार्याची माहिती ‌‘जोहड‌’मधून संकलित झाली आहे. निसर्गाचा ऱ्हास करणारे परदेशी तंत्रज्ञान उपयोगाचे नाही; परंतु आपण त्याचेच अंधानुकरण करीत आहोत. पाणीविषयक समस्येकडे बघण्याचा डॉ. राजेंद्र सिंह यांचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगळा आहे. हवामान बदलाविषयी बोलताना पाण्याविषयी बोलणे अपरिहार्य आहे, असे डॉ. सिंह यांचे ठाम मत आहे.

प्रास्ताविकात ‌‘जोहड‌’च्या इंग्रजी आवृत्तीविषयी बोलताना प्रकाशक विशाल सोनी म्हणाले, 21व्या शतकात मोठ्या प्रमाणात भेडसावणारा पाणीप्रश्न आजच्या पिढीपर्यंत पोहोचावा त्यासाठी केले गेलेले कार्य आणि कार्य करण्याची आवश्यकता हे विषय विश्वपातळीवर मांडण्यासाठी पुस्तकाची निर्मिती केली गेली आहे. याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा हेतू आहे.

डॉ. राजेंद्र सिंह यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी लोकसहभागातून कार्यकर्त्यांच्या कामाला चळवळीचे स्वरूप दिली आहे, असे मत डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केले.

मान्यवरांचे स्वागत विशाल सोनी, कैलास बवले यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या बागल यांनी केले तर आभार गुरुदास नूलकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *